पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेनेचे पदाधिकारी रघुनाथ कुचीक यांच्यावर शोषणाचे आरोप लावणार्या तरूणीने आपण या प्रकरणी संजय राऊत आणि निलम गोर्हे यांच्याकडे तक्रार करून देखील काहीही कारवाई झाली नसल्याचा दावा केला आहे.
शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर एका तरुणीने लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप केले आहेत. लग्नाचं अमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा तरुणीचा आरोप आहे. ही तरुणी अखेर समोर आली असून तिने एबीपी-माझा या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत आणि निलम गोर्हे यांच्यावर आरोप केले आहेत. आपण संजय राऊत, निलम गोर्हे यांच्याकडे मदत मागितली होती, पण कोणीही मदत केली नाही असा आरोप तरुणीने केला आहे. तसंच महिला आयोग आणि पोलिसांनी मदत न केल्यामुळेच आपण चित्रा वाघ यांच्याकडे गेलो असंही तिने सांगितलं आहे.
या संदर्भात पीडित तरूणी म्हणाली की, सर्वात प्रथम मी निलम गोर्हे यांना फोन केला होता. गुन्हा दाखल करण्याआधी मी त्यांच्याशी संपर्क साधला होता. मी त्यांना खूप फोन केले, पण त्यांनी उचलले नाही. मग नंतर मी संजय राऊतांना फोन केला होता. राऊतांनी पहिल्या वेळी फोन उचचला नाही, पण दुसर्या वेळी उचलला. यावेळी त्यांना मी तुमच्या पक्षातील या व्यक्तीने मला फसवलं असून लैंगिक अत्याचार करत गर्भपात करायला लावल्याचं सांगितलं. त्यांनी मला निलम गोर्हेंशी संपर्क करण्यास सांगितलं. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की, त्यांना अनेकदा फोन केले पण उचलत नाही आहेत. मग त्यांनी मी त्यांना फोन करतो आणि तुमचा नंबर देत संपर्क करायला लावतो असं सांगितलं. त्यानंतर १०-१५ मिनिटात निलम गोर्हेंच्या पीएचा फोन आला आणि बंगल्यावर बोलावून घेतलं.
निलम गोर्हेंनी माझ्याशी संवाद काय झालं याबद्दल विचारणा केली. यावेळी त्यांनी स्त्री आधार केंद्राचा फॉर्म भरुन घेतला. पण त्यानंतर त्यांनी परत कधी मला फोनही केला नाही आणि विचारणाही केली नाही. संजय राऊतांनीही परत फोन केला नाही, असा दावा तरुणीने केला आहे.