धरणगाव (प्रतिनिधी) शिवसेना नेत्यांवर सोशल मीडियात पोस्ट टाकून व फॉरवर्ड करून गंभीर आरोप करणाऱ्या तीन लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे आज शिवसेनेने केली आहे. गुन्हा दाखल न झाल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला आहे. दरम्यान, सोशल मीडियात टाकलेल्या या वादग्रस्त पोस्टवरून शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे. याआधी देखील सोशल मीडियातील पोस्टमुळे शिवसेना-भाजपात चांगलाच राडा झाला होता. केंद्रात,राज्यात युती झाल्यानंतर सगळं सुरळीत सुरु असतांना खाजगी कामावरून शिवसेना-भाजपात विनाकारण वाद निर्माण झाल्यामुळे जेष्ठ पदाधिकारी नाराजी व्यक्त करतांना दिसून येत आहे. दरम्यान, धरणगावातील नव्हे तर बाहेरील लोकं गावाचे वातावरण खराब करत असल्याचीही दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.
या संदर्भात अधिक असे की, मनोज झोपे नामक व्यक्तीने ‘धरणगाव नगरपालिका राजकारण’ या व्हाटस्अप ग्रुपवर एक वादग्रस्त मॅजेस टाकला. त्यात म्हटले की, गट नं. 1577 धरणगाव ह्या जमिनी संदर्भात उपोषण चालू असतांना सदर जमिनिच्या सातबारामध्ये नयना दिपक चौधरी यांच्या सोबत पार्टनर माधुरी चंद्रशेखर अत्तरदे यांचे नाव आहे. अत्तरदे या जि.प.सदस्या असून त्या भाजपा पक्षाच्या आहेत. परंतु धरणगाव पालिकेत शिवसेनेचे राज्य असून राज्यमंत्र्यांच्या दबावामुळे हे प्रकरण मंजुर होत नाही,हे राज्यमंत्र्यांना हे शोबत नाही. तसेच सपना वसावा या मुख्याधिकारी असून त्या म्हणतात की, राज्यमंत्र्यांनी हे प्रकरण मंजुर करायचे नाही,असे सांगीतले आहे. एवढेच नव्हे तर माधुरी अत्तरदे यांनी नगरध्यक्षांना ७ लाख रुपये दिलेत यावर काय म्हणणे आहे, या आशयाची पोस्ट टाकण्यात आली होती.
या पोस्टमुळे रात्रीपासूनच धरणगावातील वातावरण तणावग्रस्त झाले होते.आज सकाळी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली धरणगाव पोलिसांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात पोस्ट टाकणारे तसेच फोरवर्ड करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. गुन्हा दाखल न झाल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष पी.एम.पाटील ,प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी,नगरसेवक अहमद पठाण,विलास महाजन,प्रकाश महाजन,भागवत चौधरी,अजय जंगले,विनोद रोकडे,कमलेश बोरसे यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, ही पोस्ट टाकणारी झोपे नामक व्यक्ती धरणगाव बाहेरील असल्याचे कळते. तर खाजगी वादातून शिवसेना-भाजपात वाद निर्माण करणे अयोग्य असल्याची प्रतिक्रीया जेष्ठ कार्यकर्ते व पदाधिकारी खाजगीत व्यक्त करीत आहे.