Home उद्योग वीजबिलाचे मेसेज मराठीत पाठवा; मनसेचे महावितरणला निवेदन !

वीजबिलाचे मेसेज मराठीत पाठवा; मनसेचे महावितरणला निवेदन !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महावितरण विभागामार्फत ग्राहकांना पाठवले जाणारे विविध मोबाईल संदेश केवळ इंग्रजी भाषेत असल्याने, महाराष्ट्रातील बहुसंख्य मराठी भाषिक ग्राहकांना ते समजणे कठीण होते. यामुळे अनेकदा महत्त्वाच्या माहितीपासून ग्राहक वंचित राहतात, गैरसमज वाढतात आणि मानसिक तणाव निर्माण होतो. या गंभीर प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसेच्या वतीने महावितरण कार्यालयात निवेदन सादर केले आहे.

मनसेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, महावितरण विभागाकडून ग्राहकांना वीजबिल भरण्याची अंतिम तारीख, थकीत बिलामुळे वीज कनेक्शन तोडण्याची चेतावणी, तसेच देखभाल-दुरुस्तीमुळे होणाऱ्या वीज खंडित सेवेची माहिती देणारे एसएमएस मोबाईलवर पाठवले जातात. मात्र, हे सर्व संदेश केवळ इंग्रजी भाषेत असतात. महाराष्ट्रातील बहुसंख्य नागरिक मराठी भाषिक असल्याने त्यांना इंग्रजी भाषेतील हे संदेश पूर्णपणे समजत नाहीत. परिणामी, अनेक ग्राहकांना योग्य वेळी आवश्यक माहिती मिळत नाही, ज्यामुळे गैरसोय आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.

महाराष्ट्र शासनाचा स्पष्ट आदेश आहे की, शासकीय कार्यालयांमध्ये कामकाजाची भाषा मराठी असावी. मराठी भाषा संवर्धन आणि वापराला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. महावितरणसारख्या सामान्य नागरिकांशी थेट संबंध असलेल्या खात्याकडून त्यांच्या दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करणे अपेक्षित आहे, असे मनसेने अधोरेखित केले आहे.

या सर्व बाबी लक्षात घेता, मनसेने जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे की, महावितरण विभागाने ग्राहकांना मोबाईलवर पाठवणारे सर्व प्रकारचे संदेश (उदा. बिल भरण्याची तारीख, वीज कापणीची सूचना, सेवा खंडित झाल्याची माहिती इत्यादी) मराठी भाषेतच पाठवले जावेत. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना संदेश सहजपणे समजतील आणि महावितरण विभागावरील त्यांचा विश्वास अधिक दृढ होईल. ग्राहकाभिमुख सेवेसाठी ही बाब अत्यंत आवश्यक असल्याचे मनसेने आपल्या निवेदनात म्हटले आहे.


Protected Content

Play sound