मुंबई (वृत्तसंस्था) ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजप-शिवसेना युतीचा उमेदवार कोण?, या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले आहे. विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांचा पत्ता कापण्यात आला असून सोमय्या यांच्याऐवजी या मतदारसंघातून मुंबई महापालिकेतील भाजपचे गटनेते मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
किरीट सोमय्या यांना उमेदवारी न मिळण्यामागे शिवसेनेची नाराजी असल्याचे सांगितले जात आहे. मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान किरीट सोमय्या यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अनेक वक्तव्य केली होती. यामुळेच शिवसेना किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला विरोध करत होती. किरीट सोमय्या यांनी वारंवार प्रयत्न करुनही शिवसेनेचा विरोध मावळत नव्हता. किरीट सोमय्या यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचाही प्रयत्न केला होता. पण भेट नाकारण्यात आल्याने त्यांची निराशा झाली होती. दरम्यान, सोमय्या यांच्याऐवजी या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलेल्या कोटक यांनी मुंबई महापालिकेत प्रदीर्घ काळ नगरसेवक म्हणून काम केले असून शिवसेनेसोबतही त्यांचा चांगला समन्वय आहे. कोटक यांच्या उमेदवारीमुळे या मतदारसंघातील भाजप-शिवसेनेतील कलह आता शांत होईल, अशी चिन्हे आहेत.