वनविभागाच्या वतीने आदिवासी वस्त्यांमध्ये वणवा व्यवस्थापन चर्चासत्र

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम भागात असलेल्या पेसाअंतर्गत गावांमध्ये वनविभागाच्या वतीने ‘वणवा व्यवस्थापन’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावल पूर्व वनपरिक्षेत्र कार्यालयात आयोजित या चर्चासत्रास मोहमांडली, अंधारमळी, तिड्या या गावांतील विविध पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल फटांगरे यांनी पेसा क्षेत्रातील वनव्याच्या समस्येवर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी वणव्याची कारणे, त्याचा गौण वनउपज संकलन प्रक्रियेशी असलेला संबंध आणि नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा केली. यानंतर, मोह मांडली वनरक्षक प्रकाश बारेला, रवी तायडे आणि जितेंद्र सपकाळे यांनी प्रत्यक्ष जमिनीवर निर्माण होणाऱ्या अडचणी आणि ग्रामस्थांच्या अपेक्षा यावर आपली मते मांडली.

यावेळी मोहमांडली गावचे सरपंच मुस्तफा तडवी, अंधारमळीचे पोलीस पाटील रमजान तडवी आणि वन व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी वनविभागाला सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. त्यांनी वणवा रोखण्यासाठी ग्रामस्थांना एकत्र येण्याचे आवाहन करत ठोस उपाययोजना राबवण्याचा निर्धार व्यक्त केला. या चर्चासत्रात मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते. वनविभाग आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहकार्याने सातपुडा पर्वतातील वणव्याचे प्रमाण कमी करण्यासाठी ठोस पावले उचलली जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Protected Content