यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते समाज कंटक विकास लवांडे यांनी धार्मिक भावना दुखावणारे आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे बेताल वक्तव्य केल्याचा आरोप होत आहे. त्यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ हिंदू संघटनांनी कारवाईची मागणी केली आहे.
विकास लवांडे यांनी सार्वजनिकरीत्या संभाजी भिडे गुरुजी व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांविषयी अत्यंत खोडसाळ वक्तव्य केले. त्यांनी धारकरींना ‘हिंदू दहशतवादी’ म्हणत, त्यांच्या मोहिमा आणि ऐतिहासिक गडकिल्ल्यांच्या संवर्धनाबद्दल चुकीचे आणि द्वेषपूर्ण विधान केले. त्यांचे हे विधान धार्मिक भावना भडकवणारे असून, त्यामुळे समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. या वक्तव्याचा निषेध करत हिंदू धर्मीयांची भावना दुखावली गेल्याचे सांगण्यात आले. याविरोधात तातडीने कठोर कारवाई करावी आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी यावल पोलीस ठाण्यात निवेदन दिले. पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकुर यांना हे निवेदन देण्यात आले असून, या वेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यावल तालुका प्रमुख सागर कृष्णा लोहार, स्वप्नील करांडे, सागर कोळी, राज शिर्के, मयूर शिर्के, पार्थ सोनवणे, कमलेश शिर्के, भरत बारेला आणि सागर इंगळे आदी उपस्थित होते. हिंदू संघटनांनी हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे सांगून पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. यामुळे या प्रकरणाकडे प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.