जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कपाशीसाठी लागणारे राशी ६५९ या बियाण्यांची विक्री ठरलेल्या ८६४ रुपयांच्या किंमतीत विक्री न करता १२०० रुपयांमध्ये विक्री करणाऱ्या म्हसावद येथील कृषी केंद्र चालकाला कृषी विभागाने रंगेहात पकडल्याची घटना २३ मे रोजी दुपारी दीड वाजता समोर आली. याप्रकरणी मंगळवारी २८ मे रोजी सायंकाळी ५ वाजता कृषी विभागाने कृषी केंद्र चालकाविरुध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाण्यांची कृत्रिम टंचाई दाखवून, अनेक बियाणे विक्रेत्यांकडून बियाणे जादा दराने विक्री होत असल्याचे प्रकार घडत आहे. हा प्रकार रोखण्यासाठी कृषी विभागाकडून १६ भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. जिल्हास्तरीय भरारी पथकाकडून गेल्या आठवड्यात २३ मे रोजी दुपारी दीड वाजता जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील भुषण कृषी केंद्रावर धाड टाकली होती. या ठिकाणी ८६४ रुपयांच्या बियाण्याची विक्री १२०० रुपयांमध्ये होत असल्याचा प्रकार उघडकीला आला. या प्रकरणी बियाणे निरीक्षक तथा मोहीम अधिकारी विजय पवार यांच्या फिर्यादीवरुन मंगळवारी २८ मे रोजी सायंकाळी ५ वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात सुशील विठ्ठल महाजन (रा.खर्ची, ता.एरंडोल) याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि आसाराम मनोरे हे करीत आहे.