भुसावळ, प्रतिनिधी | हिंदु हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ‘भगवा पंधरवडा’ दिनांक २३ जानेवारीपासून शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात भुसावळ तालुक्यातील सामाजिक उपक्रमांची सुरुवात करण्यात येणार आहे.
स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनजवळ सकाळी ९ वा. , महाराणा प्रताप चौक येथे संध्याकाळी ६ वा., वरणगाव येथे मुख्य चौकात सकाळी ११ वाजता येथे स्व. ठाकरे यांचे प्रतिमा पूजन करून त्यांना मानवंदना देण्याचे वरणगाव येथील बैठकीत ठरले. शिवसेनेचे उपजिल्हा संघटक विलास मुळे, तालुका प्रमुख समाधान महाजन, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक प्रा. धिरज पाटील, भुसावळ शहर प्रमुख निलेश महाजन, शहर प्रमुख बबलू बऱ्हाटे व पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेनाप्रमुखांच्या आठवणी अनेक अवर्तने मनामनात ठेवून महिला आघाडी, युवासेना, शिक्षकसेना, शिक्षकेतर कर्मचारी सेना, रेल कामगार सेना, ग्राहक संरक्षण कक्ष, अल्प संख्याक आघाडी, दिव्यांग सेना, एस.टी. कामगार सेना, वाहतूक सेना, शेतकरी सेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी यामध्ये मोठ्या संख्येत सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.
प्रत्येक प्रभागात प्रत्यक्ष भेटी देणार: समाधान महाजन
भुसावळ तालुक्यातील शहर व ग्रामीण भागात प्रत्येक प्रभागातील समस्या जाणून घेण्यासाठी नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी दिल्या जातील व त्यांच्याकडून एक माहितीपत्रक भरून घेतले जाणार आहे. भुसावळ प्रभाग क्रमांक एकपासून या अभियानाची सुरुवात होणार आहे. नागरिकांच्या समस्या शासन दरबारी निवेदन देऊन मांडण्याचा संकल्प शिवसेना तालुका प्रमुख समाधान महाजन यांनी केला आहे. ग्रामीण भागातील विकासाची रखडलेली कार्ये, शिक्षण समस्या, रोजगार व आरोग्याच्या सोयी सुविधा याबाबतीत नागरिकांशी चर्चा करू. महिला व लाभार्थ्यांसाठी बचत गट, वस्ती स्तर बचत गट, शहर स्तर बचत गट बनविणे यासाठी राज्यशासनाच्या विविध योजनांची विस्तृत माहिती दिली जाईल असेही महाजन यांनी सांगितले.
ग्रामीण भागात गावागावात कार्यक्रम: विलास मुळे
शिवसेनेच्या ८० % समाजकारण या धोरणानुसार ग्रामीण भागातून फेकरी येथून सामाजिक उपक्रमांची सुरुवात होईल. यामध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, रांगोळी स्पर्धा, क्रीडा स्पर्धा व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येईल. आरोग्य शिबिर, व्यंगचित्र प्रदर्शन, आरोग्य शिबिरांसारखे सामाजिक उपक्रम होतील असे उपजिल्हा संघटक विलास मुळे यांनी सांगितले. शिवसैनिक नोंदणी अभियान: प्रत्येक गावागावात शिवसैनिकांची नोंदणी, गावपातळीपर्यंत शिवसेना शाखांची पुनउर्भारणी, शाखा प्रमुखांची निवड, प्रत्येक गावात सभा तसेच ग्रामीण रूग्णालयात प्रस्तुतीगृह व इतर वार्डातील रूग्णांना फळ वाटप रूग्णालयात त्या दिवशी जन्मना-या नवजात मुली व त्यांच्या मात्यापित्याचा सन्मान करण्यात येईल असे विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे यांनी सांगितले.शिवसेनेचे राजकीय पटलावर स्वतंत्र अस्तित्त्व असले तरी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रति निष्ठा व सन्मान असणारे अनेक लोक वेगवेगळ्या पक्षात आहेत. स्व. बाळासाहेबांना वंदन करण्यासाठी सर्वच पक्षाचे नेते व प्रतिनिधी उपस्थित असतील असे शिवसेना शहर प्रमुख निलेश महाजन व बबलू बऱ्हाटे यांनी सांगितले आहे.