जळगाव (प्रतिनिधी) जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातील उमेदवार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर विरोधकांपेक्षा स्वकीयांनीच हल्ले सुरु केले आहेत. यानिमित्ताने शिवसेनेतील मतभेद उघड झाले असून कधीकाळचे कट्टर समर्थक जाहीरपणे गुलाबभाऊंवर लावत असलेले गंभीर आरोप त्यांची चिंता तर अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांचे मनोबल वाढविणारे आहेत.
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ लकी टेलर यांनी माघार घेतल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली. यावेळी लकी टेलर यांच्यासह माजी जि.प. उपाध्यक्ष जानकीराम पाटील यांनी आपला पाठींबा अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांना देत असून उद्यापासून त्यांच्या प्रचारात सहभागी होणार जाहीर करून टाकले. या आधी जानकीराम पाटील यांनी देखील जाहीर पत्रकार परिषद घेत ना. पाटील यांच्यावर भ्रष्टाचार, शिवसेना संपविल्याचा एवढेच नव्हे, तर मराठा समाजात भांडणं लावण्याचा,असे गंभीर आरोप केले होते. हे वादळ शांत होत नाही तोच, जळगाव बाजार समितीचे माजी सभापती लकी टेलर यांनी देखील गुलाबराव पाटील यांच्यावर गंभीर आरोप लावत खळबळ उडवून दिली. एवढेच नव्हे तर, दोघांनी आपला पाठींबा अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांना जाहीर केला.
जानकीराम पाटील आणि लकी टेलर हे दोघं जण गुलाबराव पाटील यांचे कधीकाळी कट्टर समर्थक होते. हे दोघं जण आजही आम्ही शिवसैनिक असल्याचे सांगतात. तर गुलाबराव पाटील यांनी जानकीराम पाटील यांचा शिवसेनेशी संबंध नसल्याची प्रतिक्रिया दिली होती. परंतू जानकीराम पाटील हे अगदी काही दिवस पूर्वीपर्यंत ना.पाटील यांच्यासोबत दिसत होते. त्यामुळे ना.पाटील यांची प्रतिक्रिया प्रभावी दिसत नाही. मुळात प्रश्न असा आहे की, हे दोघं जण गुलाबभाऊंच्या विरोधात का गेलेय? याचा शोध घेतला. तर याची उत्तर जिल्हा परिषद निवडणूक आणि जळगाव बाजार समितीच्या झालेल्या अविश्वास ठरवत दडपून असल्याचे दिसून येते.
धरणगाव तालुक्यातील साळवा-नांदेड गटात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी धरणगाव कृउबाचे माजी सभापती प्रमोद पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आणि अचानक माजी जि.प.उपाध्यक्ष जानकीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत आपल्याला गुलाबराव पाटील यांनी मदत केली नाही. त्यामुळे आपला पराभव झाला,अशी जानकीराम पाटील यांच्या मनात खदखद आहे. अगदी त्यांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत यावरून गुलाबराव पाटील यांच्यावर गंभीर आरोपही लावले. अर्थात शिवसेनेचा बाले किल्ला असूनही झालेला पराभव जानकीराम पाटील यांच्या समर्थकांच्या चांगलाच जिव्हारी लागणे स्वाभाविक होते.
दुसरीकडे जळगाव बाजार समिती निवडणुकीत लकी टेलर यांच्याविरुद्ध अविश्वास आणणाऱ्या गटाला गुलाबराव पाटील यांची साथ होती. गुलाबभाऊंचे खंदे समर्थक असूनही पदावरून खाली उतरविण्यात आल्यामुळे लकी टेलर यांची नाराजी स्वाभाविक आहे. एवढेच नव्हे तर, जिल्हा परिषदच्या वेळी देखील गुलाब पाटील यांनी मदत न केल्यामुळे पराभव झाल्याची नाराजी लकी टेलर यांची आहे. आजच्या घडीला ही नाराजी एवढी टोकाची झालीय की, त्यांनी थेट गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध बंड पुकारत उमेदवारी दाखल केली होती. आता तर लकी टेलर यांनी चंद्रशेखर अत्तरदे यांना पाठींबा दिल्यामुळे जळगाव तालुक्यातील राजकीय गणित पूर्णपणे बदलले आहे.
एकंदरीत विरोधाकांपेक्षा स्वकीयांच्या आरोपाने गुलाबराव पाटील हे पुरते बेजार झाले आहेत. धरणगावात देखील शिवसेनेचा एक मोठा गट नाराज असल्याचे कळते. राष्ट्रवादीतून विरोधकांना शिवसेनेत प्रवेश दिला. एवढेच नव्हे तर त्यांना विविध बांधकामाचे ठेके देण्यात आलेत. यावरून मोठी नाराजी असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे माजी जि.प.सदस्य रावसाहेब पाटील, उपजिल्हा प्रमुख जळकेकर महाराज हे देखील प्रचारात पाहिजे तसे सहभागी दिसत नाहीय. त्यामुळे जानकीराम पाटील आणि लकी टेलर सांगत असल्याप्रमाणे शिवसेनेत एक मोठा गट खरच नाराज आहे का? नाराज असेल तर याचे आत्मपरीक्षण गुलाबराव पाटील यांना आता करणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांना याचा फटका या निवडणुकीत बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.