जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पर्यावरण व भूशास्त्र प्रशाळेतील उपयोजित भूविज्ञान विभागाचे प्रमुख प्रा.एस.एन.पाटील यांच्या भूशास्त्रातील संशोधनाची दखल घेऊन नॅशनल अकादमी ऑफ सायन्सेस इंडियाच्या सदस्यपदी निवड झाली आहे.
उत्तर महाराष्ट्र विभागातून सदस्य होण्याचा पहिला बहूमान त्यांना प्राप्त झाला आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधन कार्याच्या प्रकाशनासाठी आणि विचारांची देवाण घेवाण व्हावी म्हणून नॅशनल अकादमी ऑफ इंडियाची स्थापना १९३० मध्ये करण्यात आली आहे. डॉ.एस.एन.पाटील हे गेल्या तीस वर्षांपासून भूशास्त्र विषयात संशोधन व शैक्षणिक कार्य करीत आहेत. ८४ शोधनिबंध प्रसिध्द झालेले असून सात संशोधन प्रकल्प त्यांनी पूर्ण केलेले आहेत. आठ विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. पूर्ण केली असून एक विद्यार्थी पोस्ट डॉक्टरेट संशोधन करीत आहे. या विषयातील कार्यरत भारतातील दहा संस्थामध्ये ते कार्यरत आहेत. ते भूशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या या निवडीचे प्रभारी कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन, प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.बी.व्ही.पवार यांनी अभिनंदन केले आहे.