भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर असोसिएशन आयोजित ‘बिसारा लेडीज ईक्वालिटी रनच्या सदिच्छा दूत’ म्हणून जळगाव येथील सुप्रसिद्ध धावपटू प्रेमलता सिंग यांची निवड करण्यात आली आहे.
दि.२७ मार्च रोजी ही स्पर्धा भुसावळ येथील रेल्वे क्रीडांगणावर आयोजित करण्यात आली आहे. दि. २१ मार्च नाव नोंदणीची शेवटची तारीख आहे. असे संयोजिका डॉ. नीलिमा नेहते व डॉ. चारुलता पाटील यांनी सांगितले.
प्रेमलता सिंग यांनी आतापर्यंत २१ किमीच्या अर्ध मॅरेथॉनमध्ये १३ वेळा तर १० किमीच्या स्पर्धेत १० वेळा यशस्वी सहभाग नोंदविला आहे. जालना हाफ मॅरेथॉन स्पर्धेत त्यांनी २१ किमी अंतर २ तास २३ मिनिटात पूर्ण करून पोडियम फिनिशरचा किताब प्राप्त केला होता.
एक गृहिणी ते यशस्वी धावपटू हा त्यांचा प्रवास थक्क करणारा असून तमाम महिला वर्गासाठी प्रेरणादायी आहे. २०१६ साली सुरुवातीला ५०० मीटर धावणे दुरापास्त असताना धावणे सुरू केल्यानंतर रक्तदाब आपोआप नियंत्रणात आला असे त्या म्हणतात. नजीकच्या भविष्यात ४२ किमी पूर्ण मॅरेथॉन आपण लवकरच पूर्ण करू असा मानस त्यांनी बोलून दाखविला.