जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर केली असून या योजनेअंतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये २२ विद्यार्थी प्रशिक्षणार्थी म्हणुन रुजु झाले आहेत. एकुण २९ विद्यार्थ्यांना नेमणूक करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. उर्वरीत विद्यार्थी लवकरच प्रशिक्षणार्थी म्हणून रुजु होतील.
महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर केली आहे. या योजनेत सहा महिन्यांसाठी शासकीय कार्यालयांमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून नेमणूक देवुन त्यांच्याकडून कार्यालयीन कामकाज करुन घेणे अपेक्षीत आहे. यातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणार आहे. या विद्यार्थ्यांचे विद्यावेतन राज्यशासन देणार आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासाठी २९ विद्यार्थ्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून नेमणूक करण्यास शासनाने मान्यता दिली. गेल्या आठवड्यात या विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात आल्या. १२ वी पास/आयटीआय/ पदवीधर/पदव्युत्तर किंवा पदविका धारक अशी शैक्षणिक पात्रता होती. बांधकाम, ग्रंथालय, वित्त, विद्युत आदी विभागामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू करुन घेण्यात आले. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा परिचय कुलगुरु प्रा. व्ही.एल.माहेश्वरी यांच्याशी करुन देण्यात आला. यावेळी कुलसचिव डॉ.विनोद पाटील, वित्त व लेखा अधिकारी सीए. रवींद्र पाटील, संचालक डॉ.राजेश जवळेकर उपस्थित होते.