प्रयागराज-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याच्या विविध पायाभूत सुविधा आणि परिसराचे आश्चर्यकारक छायाचित्रे उपग्रहांद्वारे टिपली आहेत. हैदराबादमधील राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटर च्या संकेतस्थळावर ही छायाचित्रे प्रकाशित करण्यात आली असून, महाकुंभमेळ्याच्या व्यापक तयारीची झलक यातून मिळते.


इस्रोच्या अत्याधुनिक ऑप्टिकल उपग्रहांबरोबरच डे-नाईट रडारसॅटचा वापर करून महाकुंभ परिसरातील पायाभूत सुविधांचे चित्रण करण्यात आले आहे. NRSCचे संचालक डॉ. प्रकाश चौहान यांनी याबाबत सांगितले की, “प्रयागराज परिसरातील ढगांच्या पट्ट्यांमधून रडारसॅटच्या सहाय्याने चित्रण करण्यात आले आहे. यातील छायाचित्रे १५ सप्टेंबर २०२३ ते २९ डिसेंबर २०२४ या कालावधीत घेतली आहेत. यात तात्पुरती तंबूसिटी, पोंटून पूल, रस्त्यांचे जाळे आदींचे स्पष्ट दर्शन घडते.

४० कोटी भाविकांसाठी उत्तर प्रदेश सरकारने महाकुंभ नगर नावाचा एक नवीन जिल्हा तयार केला आहे. ज्यामध्ये १,५०,००० हून अधिक तंबू, ३,००० स्वयंपाकघरे, १,४५,००० स्वच्छतागृहे आणि ९९ पार्किंग लॉटचा समावेश आहे. महाकुंभ सुरू होण्यापूर्वी ६ एप्रिल २०२४ रोजी घेतलेल्या छायाचित्रांमध्ये प्रयागराज परेड ग्राउंड दिसत आहे. त्यानंतर येथे मोठे बदल होत असतानाचे २२ डिसेंबर २०२४ रोजी छायाचित्र आहे. यानंतर जेव्हा त्याचा वापर सुरू झाला तेव्हा १० जानेवारी २०२५ रोजी घेतलेल्या छायाचित्राचाही यात समावेश आहे.

यामध्ये नवीन शिवालय उद्यानाच्या निर्मितीच्या छायाचित्रांचाही समावेश आहे. जी अवकाशातून घेतली आहेत. ६ एप्रिल २०२४ च्या छायाचित्रात एक मोकळे मैदाना दिसत आहे. त्यानंतर २२ डिसेंबर २०२४ रोजी घेतलेल्या छायाचित्रांमध्ये, शिवालय उद्यान अस्तित्वात आल्याचे पाहायला मिळत आहे.



