
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सोनी नगर व पिंप्राळा परिसरात गेल्या काही दिवसांत वाढलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या वतीने सोनी नगरात गुरुवारी रात्री एक विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी सुरक्षा विषयक उपाययोजनांवर चर्चा करत नागरिकांच्या सहकार्याची गरज अधोरेखित केली. विशेषतः, परिसरात लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, रात्रीची गस्त वाढवणे आणि मंदिरात मौल्यवान वस्तू न ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

गुरुवारी रात्री ८.३० वाजता आयोजित बैठकीनंतर गणेशोत्सव मंडळाच्या आरती कार्यक्रमात पोलीस निरीक्षक गुंजाळ यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, चोरीच्या वाढत्या घटनांवर आळा बसवण्यासाठी पोलिसांनी कारवाई तीव्र केली असली तरी स्थानिक नागरिकांनी देखील सजग राहणे आवश्यक आहे. यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे अत्यंत उपयुक्त ठरणार असून, प्रत्येक गल्ली व मुख्य मार्गांवर त्यांची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
या बैठकीत डीबी पथकाचे पोलीस कर्मचारी सुधाकर अंभोरे, सुशील चौधरी तसेच स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये नरेश बागडे, विनोद निकम, मनसेचे उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, सरदार राजपूत, नारायण येवले, यशवंत पाटील, अजय बागडे, सोपान पाटील, भैय्यासाहेब बोरसे, संजय भोई, ताराचंद जोगी, निंबा महाले, हेमंत सूर्यवंशी यांचा समावेश होता.
विशेष बाब म्हणजे, मनसेचे उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे यांनी सोनी नगर परिसराच्या सुरक्षेसाठी १० सीसीटीव्ही कॅमेरे भेट म्हणून देणार असल्याची घोषणा यावेळी केली. या उपक्रमामुळे परिसरात होणाऱ्या संशयास्पद हालचालींवर नियंत्रण ठेवणे सुलभ होणार आहे. पोलिसांसोबत स्थानिक नागरिक आणि सामाजिक संस्था मिळून जर काम करतील, तर गुन्हेगारीला आळा घालणे शक्य आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी केतन पाटील, दीपक महाले, निलेश माळी, उमेश येवले, पवन भोई, ओंकार जोशी, कृष्णा जोशी, कृष्णा भोई, उदय महाले, पीयूष कोळी, अभिषेक हिवराळे, हेमंत सूर्यवंशी, वेदांत बागडे, तुषार जाधव तसेच सोनी नगरातील महिला मंडळ व युवकांनी विशेष मेहनत घेतली.



