सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात बारावी बोर्डाची परीक्षा ११ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू होत असून परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी प्रशासनाने कडक सुरक्षा उपाययोजना केल्या आहेत. गैरप्रकार रोखण्यासाठी ड्रोनच्या सहाय्याने संपूर्ण परीक्षा केंद्राचे निरीक्षण करण्यात येणार आहे.
सुरक्षा उपाययोजना
प्रत्येक परीक्षेसंबंधी कर्मचाऱ्याला ओळखपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. परीक्षा केंद्राच्या ५०० मीटर परिसरात बाहेरील कोणालाही प्रवेश निषिद्ध राहील. गैरप्रकार होऊ नयेत यासाठी या परिसरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. निवडणुक आयोग प्रमाणे सर्व बंधने असतील तसेच चून्याने बॉर्डर आखली जाईल. शिक्षणाधिकाऱ्यांना परीक्षेच्या एक दिवस आधी संपूर्ण तयारीबाबत लेखी पत्र देणे आवश्यक असेल. गैरप्रकार करणाऱ्यांवर त्वरित गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. परीक्षा दालनातील सर्व खिडक्या बंद ठेवण्यासह पुरेशा प्रमाणात प्रकाशव्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सीसीटीव्ही व्हिडिओ कॅमेरे सातत्याने सुरू राहणार असून, मुख्य प्रवेशद्वारावर एक विशेष कॅमेरा कार्यान्वित केला जाणार आहे. परीक्षा सुरू असताना बाहेर कोणीही थांबू नये, यासाठी कारवाई केली जाणार आहे. परीक्षा केंद्राच्या परिसरात कोणत्याही संशयित हालचाली आढळल्यास कारवाई होईल. सर्व कर्मचाऱ्यांचे मोबाईल परीक्षेच्या सुरक्षेसाठी ताब्यात घेतले जाणार असून, परीक्षेच्या वेळी मोबाईल किंवा अन्य कोणतेही मदतीचे साधन वापरताना आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. पर्यवेक्षकांनी प्रश्नपत्रिका बाहेर जाऊ नयेत याची काळजी घ्यावी, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल. शिपाई किंवा क्लार्क जर कॉपी पुरवण्यास मदत करताना आढळले, तर कोणतीही संस्था असो, कोणावरही हलगर्जीपणा दाखवला जाणार नाही.
या सर्व उपाययोजनांमुळे बारावी बोर्ड परीक्षेचा सुसंघटित व पारदर्शक पद्धतीने आयोजन करण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे. ही माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य अर.बी.वाघुळदे, उपप्राचार्य डॉ.मनोहर सुरवाडे व कनिष्ठ महाविद्यालय सुपरवायझर प्रा.उत्पल चौधरी यांनी दिली आहे.