जळगाव–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील वाढत्या राजकीय हालचाली आणि संभाव्य कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. हा आदेश ३० जानेवारी २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजेपासून ते १४ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत प्रभावी राहणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था व महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात राजकीय हालचालींना वेग आला असून संभाव्य पक्षांतर आणि त्यातून उद्भवणाऱ्या तणावाची शक्यता लक्षात घेऊन सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

या आदेशानुसार संबंधित कालावधीत जिल्ह्यात शस्त्र, दाहक व स्फोटक पदार्थ बाळगणे, दगडफेक, प्रतिकात्मक दहन, अश्लील किंवा शांतता भंग करणारी भाषणे व हावभाव करणे यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही सभा, मेळावे किंवा मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात आली आहे.
तथापि, हा आदेश शासकीय कार्यक्रम, अंत्ययात्रा, लग्न समारंभ तसेच धार्मिक मिरवणुका यांना लागू राहणार नाही. कर्तव्यावर असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनाही या आदेशातून वगळण्यात आले आहे.
हे प्रतिबंधात्मक आदेश अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी जारी केले असून नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शांतता व कायदा-सुव्यवस्था टिकवून ठेवणे हे प्रशासनाचे प्राधान्य असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.



