जळगाव प्रतिनिधी । भाजपाने आज दुसरी उमेदवारी यादी जाहिर केली आहे. यातही पुन्हा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काही तासांपुर्वी जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन यांनी आपली प्रतिक्रीया देतांना तिकीट न मिळण्याचे संकेत दिले होते. ते खरे ठरते की काय अशा सवाला व संभ्रम भाजपाचे खडसे समर्थकांमध्ये निर्माण झाला आहे.
पालकमंत्र्यांचे संकेत खरे ठरणार ?
पत्रकारांनी मुक्ताईनगरबद्दल विचारलेल्या प्रश्नावर ना. महाजन यांनी त्याबद्दल मुख्यमंत्री व पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असे उत्तर दिले असले तरी रोहिणी ताईंना तिकीट मिळण्याची चर्चा आहे, या पुढच्याच प्रश्नाला त्यांनी कुणाचेही नाव त्या मतदार संघासाठी फायनल होवू शकते, अगदी नाथाभाऊ सुचवतील त्या कुणाचेही नाव असू शकते, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे यावेळी नाथाभाऊंना तिकीट मिळणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळाले होते. आता दुसऱ्या यादीतही नाव नसल्याने खडसे समर्थक कार्यकर्ते नाराज झाले आहे.