मुंबई वृत्तसंस्था । भांडवली बाजारात सूचिबद्ध कंपन्यांनी त्यांच्यावरील कर्ज (मुद्दल व व्याज रकमेसह) ३० दिवसांपल्याड थकविले तर ते त्यांनी पुढील २४ तासांत जाहीर करणे बंधनकारक असल्याचे सेबीने बुधवारी जाहीर केले आहे. याबाबतची रकमेसहची सविस्तर माहिती कंपन्यांनी भांडवली बाजाराला कळविणे, अनिवार्य असल्याचे सेबीचे अध्यक्ष अजय त्यागी यांनी सांगितले आहे.
कर्जाचे हप्ते सातत्याने थकविणाऱ्या कंपन्यांकडून दिले गेलेल्या अर्थव्यवस्थेतील ताज्या धक्क्यांच्या पार्श्वभुमीवर थकीत कर्जे जाहीर करण्याबाबतच्या अटी अधिक कठोर करण्यात आल्या आहेत. कंपन्यांच्या आर्थिक स्थितीबाबतची माहिती सार्वजनिक झाल्याने त्याबाबत गुंतवणूकदारांना मार्गदर्शन मिळेल, असे नमूद करताना त्यागी यांनी याबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी येत्या १ जानेवारी २०२० पासून होईल, असेही सांगितले. अर्थसंकटातील कंपन्यांसमोरील भविष्यातील धोका कमी होण्याच्या दृष्टीने घेतलेल्या या निर्णयावर सेबीच्या संचालक मंडळाने बुधवारी बैठकीत शिक्कामोर्तब केल्याचेही ते म्हणाले.