जळगाव (प्रतिनिधी) येथील जामनेर रस्त्याला असलेल्या महापालिकेच्या गोडाऊनमध्ये लाखोचे भंगार रामभरोसे पडलेले आहे. महापालिकेचे लाखोचे भंगार सुरक्षारक्षका विना तसेच योग्य पद्धतीने गेटला कुलूप न लावता बंद केल्यामुळे हे लाखोचे भंगार चोरी होण्याची भीती वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे याच रस्त्याने जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन हे नेहमीच जामनेरला ये-जा करत असतात.
जामनेर रस्त्यावरील आर.एल चौफुलीलगत असलेल्या महापालिकेच्या गोडाऊनमध्ये पडलेल्या या भंगारात खराब झालेले एक जेसीबी,रोड लोलर, कचरापेट्या, दुधाच्या टपऱ्या यासह इतर साहित्य अस्ताव्यस्त सामानाचा समावेश आहे. महामार्गालगतचे हे गोडाऊन असल्याने येथून भंगार चोरीला जाण्याची शक्यता अधिक आहे. तसेच या ठिकाणी महापालिकेच्या वाहनांसाठी डिझेल पंप आहे. असे असताना केवळ मुख्य गेटला कुलूप लावण्यात आले असून महामार्गाच्या बाजूस असलेले गेट केवळ कडी लावून बंद करण्यात आलेले आहे. यातून महापालिकेचा निष्काळजीपणा समोर येत आहे. महापालिका प्रशासन व सत्ताधारी महापालिकेच्या मालमत्तेबाबत किती प्रमाणात जागरूक आहेत, हे देखील त्यातून दिसून येत आहे. दरम्यान, भंगार चोरी झाल्यास किंवा चोरीला गेलेले असल्यास जबाबदार कोण ? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.