Home क्राईम शालेय विद्यार्थिनीवरील अत्याचार प्रकरण : पहूर पत्रकार संघटनेकडून  पोलिसांकडे निषेधाचे निवेदन 

शालेय विद्यार्थिनीवरील अत्याचार प्रकरण : पहूर पत्रकार संघटनेकडून  पोलिसांकडे निषेधाचे निवेदन 


पहूर, ता. जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील एका शाळेत  शाळेत शिक्षण घेत असलेल्या दहावीच्या विद्यार्थिनीवर स्कूल बस चालकाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली असून, या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे. या अमानुष कृत्याचा तीव्र निषेध नोंदवत पहूर शहर पत्रकार संघटनेने पोलिस स्टेशनमध्ये निवेदन सादर करत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

ही विद्यार्थिनी रोज तालुक्यातील एका शाळेत शिक्षणासाठी येत होती. दरम्यान, शाळेची बस चालवणाऱ्या चालकाने तिच्यावर अत्याचार केल्याने संपूर्ण समाजमन हादरले आहे. या घटनेने मानवतेला काळीमा फासला असून समाजात भय आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या घटनेचा निषेध करत पहूर शहर पत्रकार संघटनेने पोलिस उपनिरीक्षक गणेश सुस्ते यांना निवेदन सादर केले.

या निवेदन प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष डॉ. संभाजी क्षीरसागर, उपाध्यक्ष जयंत जोशी, ज्येष्ठ पत्रकार शरद बेलपत्रे, प्रवीण कुमावत, ईश्वर हिवाळे यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते. त्यांनी या प्रकाराला फक्त गुन्हा न मानता एक सामाजिक कलंक मानत, आरोपीवर त्वरीत आणि कठोर कारवाई करण्याची मागणी लावून धरली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस प्रशासनाने तातडीने आरोपीला अटक करून त्याला न्यायालयीन प्रक्रियेतून शिक्षा सुनावण्याचे काम करावे, असे स्पष्ट मत संघटनेतर्फे मांडण्यात आले.

निवेदनावर सचिव गीता भामेरे, ज्येष्ठ पत्रकार शांताराम लाठे, मनोज जोशी, रवींद्र लाठे, सादिक शेख, रवींद्र घोलप यांच्यासह इतर सर्व पत्रकार बांधवांच्या स्वाक्षऱ्या असून, समाजात अशा विकृत प्रवृत्तीचा बंदोबस्त करण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून आवाज उठवण्याची भूमिका यावेळी संघटनेने बजावली.

या संपूर्ण घटनेने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळा आणि वाहतुकीच्या सुरक्षेबाबत नव्याने प्रश्न उपस्थित झाले असून, या प्रकरणात कठोर कारवाई होईपर्यंत पत्रकार संघटना पाठपुरावा करत राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.


Protected Content

Play sound