पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुणे येथील वारजे भागात रामनगर परिसरात असलेल्या खाणीत बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दक्ष सुशांत कांबळे (वय १३, रा. रामनगर, वारजे ) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. दक्ष शिवणे भागातील एका शाळेत सातवीत शिकत होता.
दक्ष आणि त्याचे मित्र गुरुवारी १५ ऑगस्ट रोजी दुपारी खाणीत साचलेल्या पाण्यात पोहायला गेले होते. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. त्याच्याबरोबर असलेल्या मित्र घाबरले. त्यांनी या घटनेची माहिती कोणाला दिली नाही.
दरम्यान, सायंकाळपर्यंत दक्ष घरी न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी मित्रांकडे चौकशी केली. तेव्हा दक्ष आणि मित्र खाणीत पोहायला गेल्याचे समजले. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. पोलीस आणिअग्निशमन दलाच्या जवानांनी शोधमोहिम राबविली. दक्षचा मृतदेह रात्री पाण्यातून बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली.