जळगाव प्रतिनिधी | शहरातील नवीन बी.जे. मार्केटजवळ सोशल क्लबच्या नावाखाली सुरू असलेल्या जुगार अड्डयावर सहायक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापा टाकून ४६ जुगार्यांना अटक केली आहे.
शहरातील नवीन बी.जे. मार्केटजवळ नागोरी चहा दुकानाच्या वरील बाजूला सोशल क्लबच्या नावाखाली जुगार अड्डा सुरू असल्याची गुप्त माहिती सहायक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांना मिळाली होती. या अनुषंगाने त्यांनी पोलीस पथक तयार करून येथे छापा मारला. या कारवाईत ४६ जुगार्यांना अटक करण्यात आली असून ९४ हजार रूपयांची रोकड, जुगाराचे साहित्य आणि एक दुचाकी असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
नशिराबाद स्पोर्टस् फाऊंडेशन या क्लबच्या नावाखाली हा जुगार अड्डा सुरू होता. याबाबत क्लबसह अटक करण्यात आलेल्यांवर कारवाई सुरू असल्याची माहिती सहायक अधिक्षक कुमार चिंथा यांनी दिली आहे. शहरासह जिल्ह्यातील अवैध जुगार अड्डयांवर याच प्रकारे कारवाई करण्यात येणार असून नागरिकांनी याच्या आहारी जाऊ नये असे आवाहन कुमार चिंथा यांनी केले आहे.