जिल्हा दुध संघात ‘लाडका साडू योजना’ : उन्मेष पाटलांनी मंगेश चव्हाणांचे सगळेच काढले !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लाडकी बहिण प्रमाणेच जिल्हा दुध संघात ‘लाडका साडू योजना’ सुरू असून या माध्यमातून कोट्यवधी रूपयांचा गैरव्यवहार होत असल्याचा खळबळजनक आरोप माजी खासदार उन्मेष पाटील यांनी केला असून त्यांची आजच्या पत्रकार परिषदेत दुध संघाचे अध्यक्ष आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर गंभीर आरोपांची सरबत्ती केली.

माजी खासदार तथा शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उन्मेष पाटील यांनी आज पद्मालय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला त्यांच्या सोबत शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष तथा दुध संघाचे संचालक प्रमोद पाटील, माजी महापौर विष्णू भंगाळे आदींसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

याप्रसंगी उन्मेष पाटील म्हणाले की, जिल्हा दुध संघात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार सुरू आहे. नवीन संचालक मंडळ सत्तेवर आल्यानंतर झालेल्या पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दुधाला वाढीव भाव आणि बोनस देण्याच्या वल्गना करण्यात आल्या असल्या तरी प्रत्यक्षात मात्र असे झाले नाही. यामुळे जिल्ह्यातील दुध उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे. अन्य ठिकाणी पाच रूपयांपर्यंत भाववाढ मिळाली असली तरी जळगाव जिल्ह्यात मिळालेले नाही. तर शेतकऱ्यांना बोनस देण्याची घोषणा करून देखील याबाबत देखील तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत. यामुळे जिल्ह्यातील दुध उत्पादकांची फसवणूक झाल्याचा आरोप उन्मेष पाटील यांनी केला.

दरम्यान, उन्मेष पाटील पुढे म्हणाले की, जळगाव जिल्हा दुध संघात तिन्ही मंत्र्यांच्या आशीर्वादाने संघाचे अध्यक्ष आमदार मंगेश चव्हाण यांची मनमानी सुरू आहे. त्यांनी आपल्या साडूंना दुध संघाचे पूर्ण अधिकार दिले असून त्यांच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार होत आहे. यामुळे फेडरेशनमध्ये माझा लाडका साडू ही योजना सुरू असल्याचा टोला देखील त्यांनी याप्रसंगी मारला.

जिल्हा दुध संघातील दुध संकलन हे हे आहे तितकेच कायम असले तरी सोसायट्यांची संख्या मात्र कमी झालेली आहे. यामुळे वाढीव दुध हे खासगी डेअऱ्यांमधून विकत घेतले जात असून यात युरियाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या कृत्रीम दुधाचा समावेश असल्याचा खळबळजनक आरोप देखील उन्मेष पाटील यांनी या पत्रकार परिषदेत केला. यामुळे एकीकडे दुग्ध उत्पादकांचे नुकसान होत असतांना दुसरीकडे दुध संघाच्या उत्पादनांमुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असल्याचे देखील उन्मेष पाटील याप्रसंगी म्हणाले. दुध फेडरेशनमध्ये कोट्यावधी रूपयांचा भ्रष्टाचार होत असून यासाठी अध्यक्ष मंगेश चव्हाण, त्यांच्यावर वरदहस्त असणारे तिन्ही मंत्री आणि सत्ताधारी संचालक हेच सर्वस्वी जबाबदार असल्याचा आरोप देखील त्यांनी याप्रसंगी केला.

दरम्यान, याप्रसंगी दुध संघाचे संचालक तथा शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी देखील दुध संघात मोठा घोळ सुरू असल्याचा आरोप केला.

खालील व्हिडीओत पहा माजी खा. उन्मेष पाटील यांनी पत्रकार परिषदेत आ. मंगेश चव्हाण यांच्यावर झाडलेल्या आरोपांच्या फैरी !

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1721317288637613

Protected Content