Home Cities जळगाव पाडळसे येथे विकास कामांमध्ये घोटाळा; चौकशी व गुन्हे दाखल करण्याची मागणी

पाडळसे येथे विकास कामांमध्ये घोटाळा; चौकशी व गुन्हे दाखल करण्याची मागणी

0
213

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील पाडळसे गावातील ग्रामपंचायतीला १५ व्या वित्त आयोगातून मिळालेल्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आणि विकास कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. गटारी, धापे आणि इतर बांधकामांतील या कथित घोटाळ्याची सखोल चौकशी करून दोषी सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पाडळसे गावाचे ग्रामपंचायत सदस्य सुदेश बाविस्कर यांनी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

सुदेश बाविस्कर यांनी केलेल्या आरोपांनुसार, पाडळसे गावात १५ व्या वित्त आयोगाच्या निधीचा वापर योग्य पद्धतीने झालेला नाही. जी विकास कामे झाली आहेत, ती अत्यंत निकृष्ट दर्जाची असून त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. ग्रामस्थांच्या पैशाचा अपव्यय झाला असल्याचा त्यांचा दावा आहे.

या गंभीर आरोपांची तात्काळ दखल घेऊन चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी बाविस्कर यांनी केली आहे. जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत आणि योग्य कार्यवाही केली जात नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. या उपोषणाने पाडळसे ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


Protected Content

Play sound