धरणगाव प्रतिनिधी । येथील सावित्रीबाई फुले उड्डाण पुलाच्या रस्त्यावरील खड्ड्यांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाहन धारकांना वाहन चालवताना खड्डे चुकवत जावे लागते असून याठिकाणी अपघात झाल्यास कोण जबाबदार राहिल, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थितीत होत आहे.
काही ठिकाणी महामार्ग व सेवा रस्त्यांचे काम राहून गेले असले तरी महामार्ग प्राधिकरणाकडून काहीही उपाययोजना होत नाहीत. याचाच परिणाम तालुक्यातील कानपुर परिसरातील वाहन धारकांना जीवघेण्या रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांची दुर्दशा प्रसारमाध्यमांनी वेळोवेळी दाखवूनसुद्धा सरकारला जाग येत नाही का ? किती दिवस महामार्ग प्राधिकरणाच्या दिरंगाईमुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू राहणार आहे. असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थितीत होत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि प्रशासनातर्फे लवकरात लवकर खड्डे बुजविण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.