नवी दिल्ली वृत्तसंस्था । आम्ही देशाला काँग्रेसपासून वाचविले असले तरी आता काँग्रेसच्या लोकांनी आपल्या पक्षाला नेहरू व गांधींपासून वाचविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भाजप नेत्या उमा भारती यांनी केले. त्यांनी एका मुलाखतीत काँग्रेसवर सडकून टीका केली.
एनडीटिव्ही या वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत उमा भारती यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की, ज्या नेत्यांमध्ये क्षमता आहे अशा नेत्यांना राहुल गांधी पुढे येऊन देत नाहीत. जर सचिन पायलट यांना ते पुढे येऊन देत आहेत आणि अशोक गेहलोक हे त्यांच्या मर्जीविना मुख्यंमंत्रीपदी विराजमान झाले असतील तर राहुल गांधी यांना गेहलोत यांच्याविरुद्ध कारवाई करायला हवी. आम्ही देशाला काँग्रेसपासून वाचवलं आहे. परंतु आता काँग्रेसच्या लोकांना नेहरू, गांधी कुटुंबीयांपासून पक्ष वाचवण्यासाठी पुढे यायला हवं. पीव्ही नरसिंम्हा राव यांच्या कार्यकाळात काँग्रेस नेहरू आणि गांधी कुटुंबीयांपासून मुक्त झाली असं वाटत होतं. परंतु दिग्विजय सिंह आणि अर्जुन सिंह यांच्यासारख्या नेत्यांनी ते होऊ दिलं नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
दरम्यान, राम मंदिराच्या भूमिपूजनादरम्यान ओबीसी समुदायातील कोणाचाही समावेश करण्यात आला नसल्याचा सवाल चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील मागासवर्गातूनच येतात यामुळे याबाबत आपण भाष्य करणार नसल्याचे त्या म्हणाल्या.