सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील एका शाळेतच अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना शहरात घडली असून या प्रकरणी शाळेच्या संचालकासह चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज सावदा पोलीस स्थानकात एका इसमाने फिर्याद दिली आहे. यानुसार, त्याची १३ वर्षाची मुलगी ही शहरातील एका शाळेत आठवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. दिनांक ३ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास या बालिकेला शाळेचा संचालक अकरम खान अमानुल्ला खान याने त्याच्या ऑफिसमध्ये माप घेण्याचे कारण दाखवून बोलावले. याप्रसंगी त्याने विद्यार्थीनीला लज्जास्पद वाटेल असे कृत्य करत तिचा विनयभंग केला.
दरम्यान, या कृत्यामुळे प्रचंड भेदरलेल्या विद्यार्थीनीने याबाबत आपले वर्ग शिक्षक फिरोज सर यांच्यासह अर्शद सर यांना माहिती दिली. या दोघांनी शाळेचे मुख्याध्यापक इरफान सर यांना याबाबत माहिती दिली. या तिघांनी सदर बालिकेला मुख्याध्यापकांच्या कार्यालयात बोलावून ही घटना कुणालाही सांगू नये असे तिला सांगितले. यामुळे ही बालिका खूप घाबरली. यानंतर दोन-तीन दिवस ती शाळेतच गेली नाही. यावरून तिच्या आईने विचारणा केली असता या विद्यार्थीनीनी तिच्या सोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितल्याने या घटनेची वाच्यता झाला. यानंतर मुलीच्या पालकांनी सावदा पोलीस स्थानकात धाव घेतली.
या प्रकरणी सदर शाळेचे संचालक अकरम खान अमानुल्ला खान (रा. रजा नगर, सावदा), याच्यासह इरफान खान जमशेर खान (रा. रजा नगर सावदा), शेख फिरोज (पूर्ण नाव माहित नाही) तसेच शेख अरशद (पूर्ण नाव माहित नाही) या चौघांच्या विरोधात भादंवि कलम ३५४, ३५४-ए (१)(आय), १४ तसेच पोक्सो कायद्यातील कलम ८ आणि १७ अन्वये सावदा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून याचा सर्वत्र तीव्र निषेध करण्यात येत आहे. दरम्यान, शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत कुणा आरोपीला अटक झाली नसल्याचे वृत्त होते.