सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पतसंस्थेचे १२ लाख रूपयांचे कर्ज असतांनाही कर्ज नसल्याचा बनावट उतारा दिल्याप्रकरणी महिला तलाठ्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, तालुक्यातील उदळी खुर्द येथील दिनकर किसन नेमाडे यांनी जय श्रीराम ग्रामीण बिगर शेतकरी सहकारी पतसंस्थेकडून १२ लाख ३५ हजार रूपयांचे कर्ज घेतले होते. या अनुषंगाने त्यांच्या उतार्यावर या कर्जाचा बोजा बसविण्यात आला होता. त्यांनी पतसंस्थेचे बनावट शिक्के तयार करून कर्ज नील असल्याचे प्रमाणपत्र तयार केले. याच प्रमाणपत्राच्या आधारे उदळी खुर्द येथील तत्कालीन तलाठी रेखा सखरू जैस्वाल यांनी कोणतीही खातरजमा न करता त्यांना बँकेचे कर्ज भरल्याने बोजा काढण्याचे पत्र दिले. यानंतर २०१८ साली दिनकर नेमाडे यांनी नारायण कोळी यांना या जमीनीची विक्री केली.
दरम्यान, जय श्रीराम ग्रामीण बिगर शेतकरी पतसंस्थेचे दीपक भास्कर राणे यांना हा प्रकार माहिती पडल्यानंतर त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. या अनुषंगाने न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार शेतकरी दिनकर नेमाडे, खरेदी करणारे नारायण कोळी आणि दाखला देणार्या तलाठी रेखा जैस्वाल या तिघांच्या विरोधात सावदा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.