सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अपहार प्रकरणातील आरोपींना अटक न करण्यासाठी लाच मागणार्या सपोनि तसेच उपनिरिक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने अटक केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, शहरातील एका दाखल झालेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला अटक न करण्यासाठी सावदा पोलीस स्थानकाचे सपोनि देवीदास इंगोले आणि उपनिरिक्षक समाधान गायकवाड यांनी ६० हजार रूपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर १५ हजार इतक्या रूपये देण्याचे ठरले.
दरम्यान, या संदर्भात संबंधीत व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. या अनुषंगाने अँटी करप्शन ब्युरोतर्फे एका पथकाची निर्मिती करून सापळा रचण्यात आला. दरम्यान, या प्रकरणी लाच मागणार्यांना संशय आल्यामुळे त्यांनी ही रक्कम स्वीकारली नव्हती. तथापि, एसीबी पथकाच्या चौकशीत लाच मागितल्याचे सिध्द झाल्याने सपोनि देवीदास इंगोले आणि उपनिरिक्षक समाधान गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार आज सकाळी ही कारवाई जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे डीवायएसपी शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या संदर्भात शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.