सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । येथून जवळच असलेल्या रोझोदा येथील वृध्द दाम्पत्याची निर्घृण हत्या केल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या परेश खुशाल भारंबे या आरोपीला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनवली आहे.
याबाबत वृत्त असे की, रोझोदा येथे ओंकार पांडुरंग भारंबे ( वय९०) आणि त्यांची पत्नी सुमन ओंकार भारंबे (वय ८५) हे वयोवृध्द दाम्पत्य राहते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या परिसराला कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले होते. शासकीय नियमानुसार दररोज सकाळी डॉक्टर येऊन कंटेनमेंट झोनमधील नागरिकांना चेक करत असतात. या अनुषंगाने काल सकाळी डॉक्टर चेकींगसाठी आले असता त्यांना भारंबे दाम्पत्याच्या घराचा दरवाजा थोडा उघडा दिसला. आवाज देऊनही घरातून कुणी प्रतिसाद न दिल्याने त्यांनी दरवाजा उघडला. तेव्हा हे दोन्ही पती-पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्यांना दिसून आले.
दरम्यान, रात्री उशीरा पोलिसांनी परेश खुशाल भारंबे (वय३२) याला ताब्यात घेतले. परेश हा भारंबे दाम्पत्याच्या शेजारीच राहत असून तो मध्यंतरी कर्जबाजारी झालेला होता. चोरीच्या उद्देशाने तो घरात शिरला होता. मात्र त्या दाम्पत्याला जाग आली. यामुळे आपल्या कृत्याचा बोभाटा होईल म्हणून त्याने धारदार शस्त्राने पती-पत्नीला मारून टाकले. दरम्यान, खून झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लाऊन परेश खुशाल भारंबे याला अटक केली.
दरम्यान, आज परेश भारंबे याला रावेर येथील न्यायालयात सादर करण्यात आले. याप्रसंगी झालेल्या सुनावणीत न्यायाधिशांनी त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.