Home आंतरराष्ट्रीय सौदी अरेबियाकडून भारतासह ‘या’ देशातील नागरिकांसाठी मल्टीपल-एंट्री व्हिसा बंद

सौदी अरेबियाकडून भारतासह ‘या’ देशातील नागरिकांसाठी मल्टीपल-एंट्री व्हिसा बंद


दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सौदी अरेबियाने व्हिसा नियमांमध्ये मोठा बदल करत 14 देशांसाठी मल्टीपल-एंट्री व्हिसा तात्पुरता स्थगित केला आहे. या देशांमध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश, इंडोनेशिया, इजिप्त, अल्जीरिया, इराक, जॉर्डन, मोरक्को, नायजेरिया, इथिओपिया, ट्युनिशिया, सूडान, आणि यमन या देशांचा समावेश आहे. 1 फेब्रुवारी 2025 पासून हे नवे नियम लागू करण्यात येणार आहेत.

सौदी सरकारने हज यात्रेच्या व्यवस्थापनास अधिक प्रभावी बनवण्यासाठी आणि अनधिकृत प्रवाशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. 2024 मध्ये हज यात्रेदरम्यान प्रचंड गर्दी आणि उष्णतेमुळे 1200 हून अधिक यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता. यानंतर हजच्या व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते.

आता या 14 देशांतील नागरिकांना फक्त सिंगल-एंट्री व्हिसा दिला जाईल. हा व्हिसा 30 दिवसांसाठी वैध असेल आणि याचा कालावधी वाढवता येणार नाही. याचा परिणाम पर्यटन, व्यवसाय, आणि कौटुंबिक भेटी यांसाठी प्रवास करणाऱ्यांवर होणार आहे. मात्र, हज, उमरा, राजनयिक आणि निवासी व्हिसा या प्रकारांवर कोणताही परिणाम होणार नाही.

दरवर्षी हजारो भारतीय नागरिक सौदी अरेबियाला व्यवसाय, नोकरी, धार्मिक यात्रा, आणि कौटुंबिक कारणांसाठी प्रवास करतात. मल्टीपल-एंट्री व्हिसा बंद झाल्यामुळे आता भारतीय प्रवाशांना प्रत्येक वेळी नवीन व्हिसासाठी अर्ज करावा लागेल, ज्यामुळे वेळ आणि खर्च वाढण्याची शक्यता आहे.

सौदी अधिकाऱ्यांनी सांगितले की, अनेक प्रवासी मल्टीपल-एंट्री व्हिसाचा वापर करून अधिकृत परवानगीशिवाय हज यात्रा करत होते. यामुळे हज यात्रेची अधिकृत संख्या वाढत होती. नव्या नियमांमुळे हज प्रवास अधिक नियंत्रित होईल आणि अधिकृत यात्रेकरूंना सुरक्षित आणि सोयीस्कर अनुभव मिळेल. हा निर्णय व्यावसायिक आणि वैयक्तिक कारणांसाठी प्रवास करणाऱ्यांसाठी अडचणीचा ठरू शकतो, मात्र हज यात्रेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तो महत्त्वाचा पाऊल ठरेल, असे सौदी प्रशासनाचे म्हणणे आहे.


Protected Content

Play sound