नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवारी करणारे कॉंग्रेस नेते सत्यजीत तांबे पक्ष सोडण्याच्या मानसिकतेत असून ते लवकरच याची घोषणा करतील असे मानले जात आहे.
नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत कॉंग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला होता. पक्षाने त्यांना एबी फॉर्म दिला असतानाही ऐनवेळी डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. तर अगदी शेवटच्या क्षणाला त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
दरम्यान, डॉ. सुधीर तांबे यांचे कॉंग्रेसमधून निलंबन करण्यात आले असून सत्यजीत तांबे यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे. तथापि, ताज्या वृत्तानुसार पक्षनेतृत्वाच्या कारवाईच्या आधीच सत्यजीत तांबेच कॉंग्रेस सोडण्याची शक्यता आहे.
सत्यजीत तांबे यांनी सोशल मिडियावरील आपले प्रोफाइल बदलले असून ट्विटर डीपी आणि बायोमधून कॉंग्रेस पक्षाचा उल्लेख काढून टाकला आहे. यामुळे पक्ष काही निर्णय घेण्याच्या आधी तांबे हे आधीच पक्षत्याग करतील असे मानले जात आहे. या संदर्भात ते आज आपली भूमिका जाहीर करू शकतात.