Home Uncategorized सतपंथ ज्योत मंदिर जीर्णोद्धार सोहळा : धानोऱ्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

सतपंथ ज्योत मंदिर जीर्णोद्धार सोहळा : धानोऱ्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन


धानोरा, जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । “श्रद्धा असली तरच दगडात देव दिसतो” या भावनेला प्रत्यक्ष अनुभव देणारा भक्तीचा अपूर्व सोहळा धानोरा नगरीत मोठ्या उत्साहात पार पडला. सतपंथ ज्योत मंदिर जीर्णोद्धार चतुर्विध महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित श्रीमद्भागवत कथेतील ‘गोपी गीत’ प्रसंगाच्या तिसऱ्या दिवशी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज यांच्या अमृतवाणीतून उलगडलेल्या श्रीकृष्णाच्या रासलीलेच्या दिव्य प्रसंगाने हजारो भाविक मंत्रमुग्ध झाले.

या सोहळ्यासाठी धानोरा आणि परिसरातून तब्बल २५ हजारांहून अधिक भाविकांनी हजेरी लावली होती. संपूर्ण परिसर जनसागरासारखा भरून गेला होता. कथेच्या दरम्यान सतत घुमणाऱ्या ‘राधे-राधे’च्या जयघोषाने धानोरा नगरी अक्षरशः दुमदुमून गेली होती. भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्म यांचा अद्भुत संगम या ठिकाणी अनुभवायला मिळाला.

कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरले ते राजूमामा भोळे यांची उपस्थिती. कथेतील भजन आणि कीर्तनाच्या सुरांमध्ये तेही पूर्णपणे तल्लीन झाले. भजनावर ठेका धरताना त्यांचा उत्साह पाहून उपस्थित भाविकांमध्येही नवचैतन्य संचारले. लोकप्रतिनिधी आणि जनता एकत्र येऊन भक्तिरसात रमल्याचे दृश्य अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी ठरले.

कथेच्या उत्तरार्धात राधा-कृष्ण यांचा जिवंत देखावा सादर करण्यात आला, ज्यामुळे उपस्थित भाविक भारावून गेले. श्रीकृष्णाच्या रासलीलेचे जिवंत चित्रण पाहताना भक्तांनी आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. याच वेळी फुलांची होळी खेळण्यात आली आणि आकाशातून झालेल्या पुष्पवृष्टीने संपूर्ण वातावरण सुगंधित व भक्तिमय झाले.

या प्रसंगी बोलताना महामंडलेश्वर जनार्दन हरी जी महाराज यांनी सांगितले की, “भक्ती हा केवळ देखावा नसून ती अंतर्मनाची ओढ आहे. गोपी गीतातील प्रेम आणि श्रद्धा आजच्या काळातही तितकीच प्रेरणादायी आहे.” त्यांच्या या प्रवचनाने उपस्थित भाविकांना आत्मिक समाधान लाभले.

या भव्य धार्मिक सोहळ्यामुळे धानोरा परिसरात आध्यात्मिक ऊर्जेचे वातावरण निर्माण झाले असून, श्रद्धा, संगीत आणि भक्तीचा अनोखा संगम यानिमित्ताने अनुभवायला मिळाला.


Protected Content

Play sound