मुंबई- लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ उज्जवल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून निवड झाली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात प्रकरणात निकम यांची नियुक्ती व्हावी, अशी सातत्याने मागणी होत होती. मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आपल्या सात मागण्यांसाठी सुरु केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. ग्रामस्थांच्या सात मागण्यांपैकी उज्जवल निकम यांच्या नियुक्तीची एक मागणी सरकारने मान्य केली आहे. या निर्णयाचे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी स्वागत केले आहे.
उज्जवल निकम हे आपल्या कायदेशीर कौशल्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी 1993 सालच्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट मालिकेपासून ते 2008 सालच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यापर्यंत अनेक महत्त्वाचे खटले यशस्वीरित्या लढवले आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला होणार आहे.
दरम्यान, मस्साजोगमध्ये सुरु असलेल्या अन्नत्याग आंदोलनात धनंजय देशमुख आणि संतोष देशमुख यांच्या आई शारदबाई देशमुख सहभागी झाल्या आहेत. आज आरोग्य पथकाने दोघांची वैद्यकीय तपासणी केली. धनंजय देशमुख यांनी कालपासून पाणीही घेतलेले नाही, तरीही त्यांचा रक्तदाब सामान्य असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. आंदोलनाचा दुसरा दिवस असताना ग्रामस्थांचा निर्धार अधिक दृढ झाला असून, उर्वरित मागण्यांसाठी त्यांचा लढा सुरु आहे.