भुसावळ, प्रतिनिधी | येथील मतदार संघासाठी उमेदवार देताना पक्षाने विश्वासात न घेतल्याने आपण एखाद्या अपक्ष उमेदवारासाठी प्रयत्न करणार असल्याचे माजी आ. संतोष चौधरी यांनी आज (दि.५) एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
ते म्हणाले की, येथे रा.काँ. कडून सतीश घुले यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले होते. मात्र पक्षाच्या काही अडचणी असल्यामुळे ही उमेदवारी जगन सोनवणे यांना देण्यात आली. याबाबत वरिष्ठांशी बोलणे केले असता त्यांनी सांगितले की, गत निवडणुकीत सोनवणे यांचे डिपॉझिट जप्त झाले त्यांच्याऐवजी कोणालाही उमेदवारी दिली तरी ती आम्हाला मान्य आहे. त्यामुळे पक्षाचीही अडचण व आमची उमेदवाराबाबतची अडचण असल्यामुळे आणि सोनवणे यांची उमेदवारी मान्य नसल्यामुळे तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेशी चर्चा करुन उद्या (दि.६) सायंकाळी कार्यकर्त्यांचा मेळावा घेवून त्यात सर्वानुमते अपक्ष उमेदवाराला पाठींबा देण्याची घोषणा करण्यात येईल, असेही श्री. चौधरी यावेळी म्हणाले.