भुसावळ (प्रतिनिधी)। महाराष्ट्र राज्यातील चर्मकार समाज अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या उद्धारासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा संत रविदास पुरस्कार 2018-19 भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथील शारदा माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील उपशिक्षक संजीव भटकर यांना जाहीर करण्यात आला आहे.
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींची संपूर्ण महाराष्ट्रातून निवड करण्यात आली आहे. त्यात श्री. भटकर यांचा समावेश आहे. श्री. भटकर हे शिक्षक पतपेढीचे संचालक असून सोशल क्लब फेकरी, जीवन ज्योती हेल्थ सेंटर व श्री संत रविदास मंडळात सक्रिय सहभागी आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ नाशिक विभागाचे सदस्य, अंकुर साहित्य संघाचे भुसावळ तालुकाध्यक्ष, माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष, टीडीएफ तालुकाध्यक्ष म्हणूनही त्यांनी पदे भूषवली आहेत. शिक्षकांसाठी आयोजित विविध राज्य व विभागस्तरीय प्रशिक्षणात त्यांनी तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केलेले असून विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक गुणवत्ता संवर्धन उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला आहे. मॅरेथॉन स्पर्धा, सूर्यनमस्कार गृप, ज्ञानासह मनोरंजन गृप, जागर प्रतिष्ठान, अंतर्नाद प्रतिष्ठान यासह विविध सांस्कृतिक मंच सध्या काम पाहत आहेत. अशा प्रकारच्या विविध ठिकाणी केलेल्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामाबद्दल त्यांची राज्य पातळीवरील महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारासाठी निवड जाहीर झाली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने 27 फेब्रुवारी रोजी शासन निर्णय काढून या पुरस्कारार्थींची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल संजू भटकर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.