मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | संत मुक्ताई पालखी बीडहून पुढे रवाना झाली असून मुक्ताईंचे आजोबा गोविंदपंत व मुक्ताई भेटीने तृप्त होत जड अंतःकरणांनी बीड शहरवासियांनी पालखी सोहळयाला निरोप दिला.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून ०२ जून २०२३ रोजी प्रस्थान ठेवलेला आदिशक्ती मुक्ताई पालखी सोहळा बुलढाणा ,जालना मार्गे दि.१६ जून रोजी बीड शहरात दाखल झाला. मुक्ताई पालखी आणि बीड हे एक वेगळच नात होय. मुक्ताईंचे पणजोबा त्र्यंबकपंत यांचेनंतर त्यांचे जेष्ठ चिरंजीव गोविंदपंत यांनी बीड येथे देवगिरीच्या राजाचे सेनापती म्हणून काम पाहिले व बिंदूसरा नदीतिरावर बीड येथेच समाधी घेतली. म्हणूनच मुक्ताई पालखी व बीड शहरवासियाचे आगळेवेगळे प्रेम आहे.
दि.१६ जून २०२३ रोजी माळी वेस हनुमान मंदिर येथे पालखी मुक्काम होता. दि.१७ जून २०२३ रोजी पालखी पेठ बीड येथील बालाजी मंदिरात मुक्कामी जातांना रेवड्यांची उधळण करण्यात आली. रेवाड्यांची उधळण करण्याची परंपरा आजही टिकून आहे.
शहरातील नोकरी व्यवसाय निमित्ताने बाहेर असणारा बीडकर नागरिक वा लग्नानंतर सासरी गेलेली मुलगी असो पालखीचे दर्शनाला आवर्जुन येतातच. स्वयंप्रेरणेने हिरीरीने वारकरी सेवेत सहभाग घेतात,अशा सोहळ्याला नागरिकांनी गहीवरून जड अंतःकरणांनी आजोबा- नातीचे भेटीने पालखीला निरोप दिला. दरम्यान, आज दि.१८ जून रविवार रोजी दुपारचा विसावा,पाली जि.बीड येथे तर रात्रीचा मुक्काम,उदंड वडगाव – मोरगाव जि. बीड येथे आहे.