शेगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । श्री संत गजानन महाराजांच्या 147व्या प्रगटदिनाचे औचित्य साधून, भाविकांची गर्दी लक्षात घेता श्री गजानन महाराज संस्थानने मंदिर 19 व 20 फेब्रुवारी हे दोन दिवस सलग चोवीस तास खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
गुरुवार, २० फेब्रुवारी रोजी श्रींच्या प्रगट दिनानिमित्त सकाळी १० ते १२ दरम्यान हभप भरत बुवा पाटील (म्हैसवाडी) यांचे किर्तन होणार आहे. त्यानंतर श्री महारुद्र स्वाहाकार यागाची पूर्णाहूती आणि अवभृत स्नान पार पडेल. दुपारी ४ वाजता श्रींच्या पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून, या मिरवणुकीत अश्व, रथ आणि मेणा यांचा समावेश असेल. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते ८ दरम्यान हभप श्रीराम बुवा ठाकरे (लातूर) यांचे काल्याचे कीर्तन होणार असून, यानंतर प्रगट दिन उत्सवाची सांगता होईल.
या उत्सवानिमित्त महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातून मोठ्या संख्येने भजनी दिंड्या शेगावी दाखल होत आहेत, त्यामुळे संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणाने भरून गेले आहे. संस्थानने भाविकांच्या सोयीसाठी एकेरी दर्शनमार्ग ठेवला असून, दर्शनबारी, श्रीमुख दर्शन, महाप्रसाद, पारायण मंडप, औदुंबर दर्शनाची उत्तम व्यवस्था केली आहे.