मुंबई प्रतिनिधी । आणीबाणीच्या काळातील बंदीवानासाठी फडणवीस सरकारने सुरू केलेली सन्मान योजना बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
याबाबत वृत्त असे की, तत्कालीन फडणवीस सरकारने महाराष्ट्रात सन्मान योजना आखण्यात आली होती. जानेवारी २०१८ पासून लाभार्थ्यांना पेन्शन देण्यात येत होती. आणीबाणीच्या काळात ज्यांनी एक महिन्याचा तुरुंगवास भोगला त्यांना दरमहा १० हजार रुपयांची पेन्शन देण्यात येते तर ज्यांनी एक महिन्यांपेक्षा कमी तुरुंगवास भोगला त्यांना दरमहा पाच हजार रुपये देण्यात येतात. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून ही योजना बंद होण्याचे संकेत मिळाले होते. यानुसार आता ही योजना बंद करण्यात आली आहे.
कोरोनामुळे राज्याच्या कर व करेतर महसुलात घट होऊन राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. यामुळे ही योजना बंद करण्याचा निर्णय घेत असल्याचं राज्य सरकारने सांगितलं आहे. आज यासंबंधी अधिकृत आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे.