भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुसावळ विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार संजय सावकारे यांनी टपाली मतदानाच्या पहिल्याच फेरीत मोठी आघाडी घेतली असून येत्या काही तासांमध्ये संपूर्ण निकाल समोर येणार आहे.
एस. सी. प्रवर्गासाठी राखीव असणाऱ्या भुसावळ विधानसभा मतदारसंघातून आमदार संजय सावकारे यांना यंदा लागोपाठ चौथ्यांदा उमेदवारी मिळाली. त्यांना भारतीय जनता पक्षाने महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. त्यांच्या विरोधात आधीच वंचित बहुजन आघाडीने जगनभाई सोनवणे यांना उमेदवारी दिली. महाविकास आघाडीत ही जागा नेमकी कुणाला मिळणार ? यात बरेच दिवस वाया गेलेत. अखेर ही जागा काँग्रेसला मिळाली. येथून पक्षाने ख्यातनाम हृदयरोगतज्ज्ञ डॉ. राजेश मानवतकर यांना उमेदवारी दिली. यासोबत स्वाती जंगले यांनी देखील अपक्ष उमेदवारी केली.
निवडणुकीच्या दरम्यान उमेदवारांनी प्रचार फेऱ्या आणि कॉर्नर बैठका यांनाच प्राधान्य दिले. डॉ. राजेश मानवतकर यांच्या साठी आ. एकनाथराव खडसे यांनी सभा घेतली. तर संतोष चौधरी यांनी देखील त्यांना पाठींबा दर्शविला. स्वाती जंगले या लेवा पाटील समाजाच्या सूनबाई असल्याने त्यांनी देखील चांगले आव्हान उभे केल्याचे दिसून आले. येथून 57.75 टक्के इतके मतदान झाले. यात बाजी कोण मारणार ? याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.
या पार्श्वभूमिवर, आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी सुरू करण्यात आली. यात प्रारंभी टपालाने करण्यात आलेल्या मतांची मोजणी करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने शासकीय अधिकारी व कर्मचारी, दिव्यांग, वयोवृध्द आदींनी केलेल्या मतदानाचा समावेश होता. या टपाली मतदानाच्या पहिल्या फेरीत आमदार संजय सावकारे यांनी 10188 घेतली आहे.