मुंबई, वृत्तसंस्था | छोटे बंधू आमदार सुनील राऊत यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असल्याची चर्चा शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी फेटाळली असली तरी आज त्यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे संभ्रम वाढला आहे. या पोस्टमधून त्यांनी अज्ञात व्यक्तीला एक सल्ला दिला आहे, त्यात ते म्हणतात, “आपणास वेळ, साथ आणि समर्पण देणाऱ्या व्यक्तीला नेहमीच सांभाळून ठेवा.” त्यांची ही सूचक पोस्ट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांचा रोख नेमका कोणावरवर आहे, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यात संजय राऊत यांचा मोलाचा वाटा होता. सरकार स्थापनेच्या संपूर्ण प्रक्रियेत ते सातत्याने आघाडीवर होते. शरद पवारांशी त्यांची असलेली जवळीक सरकार स्थापनेमध्ये महत्त्वाची ठरली असल्याचेही बोलले जाते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांना मंत्रिपद मिळेल, अशी चर्चा सुरुवातीपासूनच होती. मात्र, शिवसेनेने तीन अपक्षांना संधी दिल्याने सुनील राऊत यांचे नाव मागे पडले. त्यावरून संजय राऊत नाराज असल्याचे बोलले जात होते तर सुनील राऊत राजीनामा देणार, अशाही चर्चा होत्या. आज संजय राऊत यांनी टाकलेल्या ताज्या फेसबुक पोस्टमुळे पुन्हा चर्चेला उधाण आलं आहे.