मुंबई प्रतिनिधी । भाजपने अजित पवार यांचा फोडले असले तरी त्यांच्यासोबत फक्त तीन-चार आमदार असल्याने हा डाव भाजपवर उलटला असल्याचे प्रतिपादन खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी केले.
खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, देशातील आणीबाणीपेक्षाही हा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल. भाजपने सचोटीने व्यापार करायला हवा होता. परंतु, यावेळी भाजपचा व्यापार चुकला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाला तडे देण्याचे काम भाजप नेत्यांकडून केले गेले आहे. भाजपच्या नेत्यांनी आता झोपेतून उठावे. कारण अजित पवारांना सोबत घेऊन त्यांनी सत्ता स्थापन केली. ही त्यांच्या अंगलट आली आहे. अजित पवार यांच्याकडे आता केवळ ३ ते ४ आमदार उरले आहेत. त्यांना फोडणे हा भाजपचा अखेरचा डाव होता व हा डाव भाजपवर उलटला आहे. त्यामुळे भाजप बहुमत सिद्ध करू शकणार नाही असा दावादेखील संजय राऊत यांनी केला.