मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ”माझा लाऊडस्पीकर हा तुमच्या भाडोत्री भोंग्यांवर भारी पडणार असल्याचे नमूद करत फडणवीस तुमची सर्व कारस्थाने मला माहीत आहेत. तुम्ही काहीही कारवाई करा !” अशा शब्दांमध्ये संजय राऊत यांनी आज त्यांना आव्हान दिले आहे.
काल भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांचा सकाळी नऊ वाजणारा भोंगा असा उल्लेख केला होता. यावर आज प्रसारमाध्यमांशी बोलतांना राऊत यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, हा शिवसेनेचा खणखणीत आवाज असून तो गेल्या ५६ वर्षांपासून गर्जना करत आहे. तुमच्या भाडोत्री भोंग्यांवर माझा लाऊडस्पीकर भारी पडणारा आहे. आणि आज तर राज्यातील प्रत्येक शिवसैनिक, प्रत्येक नागरिक, प्रत्येक महिला यांच्याकडे हा लाऊडस्पीकर असल्याचे लक्षात ठेवा असा इशाराही त्यांनी दिला.
राऊत पुढे म्हणाले की, आदित्य ठाकरे यांच्या दौर्यांना राज्यभर मिळणारा प्रतिसाद पाहून सत्ताधारी धास्तावले आहेत. शिंदे सरकार हे चोर्या-मार्या करून आलेले असून लवकरच ते अंतर्गत कलहाने पडेल असा दावा देखील त्यांनी केला. तर शिवसैनिकांच्या अश्रूंमध्ये शिंदे सरकार वाहून जाईल असेही ते म्हणाले. तर फडणवीस यांची कारस्थाने आपल्याला माहित असून त्यांनी माझ्याविरूध्द ईडी, सीबीआय, सीआयडी अशी कोणतीही कारवाई करावी असे आव्हान देखील त्यांनी दिले.