मुंबई प्रतिनिधी । शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी डॉक्टर्सबाबत काढलेल्या अनुदगारामुळे आयएमए संघटना आक्रमक झाली असून राऊत यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे.
एबीपी-माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर चांगला इलाज करत असल्याचे वक्तव्य सध्या खूप गाजत आहे. यावर सोशल मीडियात जोरदार चर्वण सुरू असतांना आता याबाबत आयएमए संघटनेनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे.
खासदार संजय राऊत यांनी समस्त डॉक्टर वर्गाची माफी मागावी अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) महाराष्ट्र शाखेने केली आहे. आयएमए कार्यकारिणीच्या रविवारी झालेल्या बैठकीत राऊत यांनी माफी मागावी या मागणीचा तसेच राऊत यांच्या निषेधाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
संजय राऊत यांनी कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी डॉक्टर आज प्राणाची बाजी लावून काम करताहेत. अशावेळी त्यांचे कौतुक करणे तर सोडाच पण राऊत यांनी डॉक्टरांपेक्षा कम्पाऊन्डरना जास्त कळतं असे म्हणणे निषेधार्ह आहे. डब्ल्यूएचओवरही त्यांनी केलेली टीका अत्यंत अनाठायी आहे. राऊत यांनी देशभरातील डॉक्टरांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांनी डॉक्टरांची माफी मागावी अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली आहे. दरम्यान, आयएमएच्या राज्यभरातील २१६ शाखांतर्फे राऊत यांच्या निषेधाचे ठराव मंजूर करण्यात आले आहेत.