
मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपल्याला थोड्यावेळापूर्वी मोबाईलवर मेसेज केल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांसोबत बोलताना दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची मुंबईत एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी पत्रकारांसोबत बोलताना म्हटले की, विरोधी पक्षात बसण्याचा कौल जनतेने महाआघाडीला दिलेला आहे. समोरच्यांनी सरकार स्थापन करावी याची आम्ही वाट पाहतोय, असेही अजित पवार म्हणाले. संजय राऊत यांनी निवडणुकांनंतर प्रथमच एसएमएस केला आहे, आपण त्याचे उत्तर देऊ असे विधान त्यांनी केले. या मेसेजमध्ये ‘नमस्कार, जय महाराष्ट्र मी संजय राऊत’, असे लिहिले होते, असेही पवार यांनी सांगितले. शरद पवार मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरु आहे, ती शक्यता मात्र अजित पवार यांनी फेटाळली आहे. शरद पवार मुख्यमंत्री होण्याची सुतराम शक्यता नसल्याचे त्यांनी सांगितले.