संजय राऊत म्हणजे शिवसेनेचे पोपट – आ. रवी राणा

aa. ravi rana

मुंबई, वृत्तसंस्था | संजय राऊत हे शिवसेनेचे पोपट आहेत, असा खोचक टोला अपक्ष आमदार रवी राणा यांनी लगावला आहे. एवढेच नाही तर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

 

येत्या काही दिवसात शिवसेनेने मुजोरी थांबवली नाही तर शिवसेनेचे किमान २५ आमदार मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देतील, असाही विश्वास रवी राणा यांनी व्यक्त केला आहे. तसेच रोज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, असा विश्वास व्यक्त करणाऱ्या संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांना रवी राणा यांनी शिवसेनेचे पोपट असे म्हटले आहे. आता यावर संजय राऊत काही बोलणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

२४ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निकालात भाजपाला १०५ तर शिवसनेला ५६ जागा मिळाल्या. त्यामुळे शिवसेनेने पाठिंबा दिल्याशिवाय भाजपाचे सरकार सत्तेत येऊ शकणार नाही, अशी परीस्थिती निर्माण झाली आहे. त्याचाच फायदा घेत मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना अडून बसली आहे. सत्तेत समान वाटा आणि अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद या शिवसेनेच्या दोन मागण्या आहेत. यावर सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. याबाबत संजय राऊत रोज पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडत आहेत. अशात आता रवी राणा यांनी संजय राऊत यांना शिवसेनेचे पोपट असे म्हटल्याने आता शेरे-ताशेरे यांचा कलगीतुरा आणखी रंगण्याची चिन्हे आहेत.

Protected Content