मुंबई प्रतिनिधी | भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या आप्तांच्या कंपनीने १०० कोटींच्या वर अपहार केल्याचे पुरावे असून यामुळे आता ईडीने त्यांची देखील चौकशी करावी अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असणार्या दैनिक सामनामध्ये केंद्र सरकारच्या पवित्र्यावर टीका करण्यात आली आहे. यात म्हटले आहे की, भाजपचे उपरे पुढारी प्रसाद लाड यांच्या नातेवाईकांच्या कंपनीचा कोट्यवधी रुपयांचा स्मार्ट सिटी घोटाळा समोर आला आहे. त्यांच्या क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा.लि. या कंपनीने सरकारी पैशाचा केलेला अपहार १०० कोटींच्या वर आहे. ईडीने तत्काळ त्याची दखल घेऊन गुन्हा नोंद करावा व अनिल देशमुख, प्रताप सरनाईक यांच्याप्रमाणे या कंपनीच्या मालकांनाही समन्स पाठवावे, असे हे गंभीर प्रकरण आहे.
यात पुढे म्हटले आहे की, अनिल देशमुखांपासून अनिल परब, प्रताप सरनाईक, रोहित पवार, अजित पवारांवर कारवाया करून महाराष्ट्र सरकारची कोंडी करता येईल या भ्रमात विरोधी पक्षाचे भोपळे आहेत. या भोपळ्यांनी कितीही टुणूक टुणूक केले तरी सत्तेचा सोपान त्यांना पार करता येणार नाही. प्रसाद लाड यांच्या नातेवाईकांच्या कंपनीचा कोट्यवधी रुपयांचा स्मार्ट सिटी घोटाळा समोर आला आहे. ईडीने आता कारवाई करावी.
यात पुढे नमूद केले आहे की, राज्य सरकार पाडण्याच्या व पडण्याच्या स्वप्नांतून महाराष्ट्रातील विरोधक बाहेर पडायला तयार नाहीत. त्यांची अवस्था ङ्गबेघर आणि बेकारफ असल्यासारखी झाली आहे. समाजातील बेघर आणि बेकार ही नक्कीच एक गंभीर समस्या आहे, पण राज्यातील बेघर आणि बेकार विरोधी पक्षाचे काय, हा खरा प्रश्न आहे. सत्तेचे छप्पर उडाल्याने बेघर आणि बेकार झालेल्या राज्याच्या विरोधकांनीही राज्यासाठी काही काम करायला हवे. मात्र तसे न करता काम करणार्या सरकारपुढे अडचणी निर्माण करण्याचे उद्योग ते करीत असल्याचा आरोप यामध्ये करण्यात आलेला आहे.