मुंबई, वृत्तसेवा| शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’तील रोखठोक सदरातून देशातील आर्थिक परिस्थितीवरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशातील कष्टकरी व मध्यमवर्गीयांचे प्रश्न सोडविल्यामुळे नव्हे, तर पाकिस्तानवरील सर्जिकल स्ट्राईक आणि कलम ३७० हटवण्याचे धाडस दाखवल्यामुळे मोदी लोकप्रिय नेते आहेत. हे निर्णय ‘फास्टफुड’सारखे आहेत. कारण बेरोजगारी आणि अन्न-वस्त्र-निवारा यावर कलम ३७० आणि सर्जिकल स्ट्राईक हे उत्तर नाही, अशी टीका राऊत यांनी केली आहे.
वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचा वादा भाजपाने केला होता. पण गेल्या वर्षभरात १.१० कोटी लोकांनी रोजगार बुडवला आहे. देशात ११ कोटी लोक बेकार असून बेरोजगारीचा दर ६. १० टक्के झाला आहे. १८ राष्ट्रीयीकृत बँकांचे थकीत कर्ज १० लाख कोटींच्या वर गेले आहे. त्यामुळे बँकिंग उद्योग बुडाला. सरकारकडून नव्या गुंतवणूकीचे वायदे केले जात आहेत. पण आतापर्यंत ५०१ रूपयांची तरी गुंतवणुक आली आहे काय? असा सवाल राऊत यांनी केला आहे.मेक इन इंडिया आणि स्किल इंडिया कार्यक्रम फौल ठरले आहेत. आजच्या परिस्थितीला नेहरू जबाबदार नाहीत. त्यामुळे त्यांचे पुतळे तोडून स्थिती सुधारणार नाही. गेल्या पाच वर्षात रूपया रोज घसरतो आहे. रूपया घसरला आणि डॉलर वधारला याचे खापरही काँग्रेसवर फोडता येणार नाही. मनमोहन सिंग यांच्या काळात भ्रष्टाचाराची मोठी प्रकरणे घडली, पण उद्योग जगात मोकळे वातावरण होते. त्यामुळे रोजगार आणि पैसा दोन्हींची व्यवस्था होती. मोदी सरकारने भ्रष्टाचार रोखण्यासाठी उद्योगांचे नाक दाबण्याबरोबर तोंडातही बोळा कोंबला आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.