मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | किरीट सोमय्या यांनी मोतीलाल ओसवाल कंपनीकडून त्यांच्या युवक प्रतिष्ठानसाठी गैर मार्गाने लाखो रूपये स्वीकारल्याचा आरोप आज खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा नवा आरोप केला आहे. किरीट सोमय्या यांनी मोतीलाल ओसवाल कंपनीकडून लाखो रुपये त्यांच्या युवक प्रतिष्ठानसाठी घेतले, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे. संजय राऊत यांनी केलेल्या ट्वीटमध्ये सोमय्यांवर आरोप करताना म्हटले की, एनएसईएलमध्ये 5600 कोटींचा घोटाळ्या प्रकरणी सोमय्यांनी चौकशीची मागणी केली होती. मोतीलाल ओस्वाल या कंपनीच्या शिपयाच्या घरी जात सोमय्या यांनी तमाशा केला. या प्रकरणाची ईडीनेदेखील चौकशी केली. मात्र, त्यानंतर 2018-19 मध्ये किरीट सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला मोतीलाल ओस्वाल कंपनीकडून लाखोंची देणगी मिळाली असल्याचा आरोप राऊत यांनी केला.
गेल्या अनेक दिवसांपासून खासदार संजय राऊत आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यात आरोप-प्रत्यारोप होत असून आता राऊत यांनी आज सकाळीच नव्याने आरोप केल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे. या अनुषंगाने त्यांनी आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून याला सोमय्या काय उत्तर देणार याकडे लक्ष लागले आहे.