मुंबई प्रतिनिधी । मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात काही मुद्यांवर चर्चा झाली असली तरी यात शिवसेनेच्या नाराजीचा कोणताही प्रश्न नसल्याचे प्रतिपादन खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
काल सायंकाळी उध्दव ठाकरे व शरद पवार यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यात ठाकरे यांनी आपली नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत खासदार संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलतांना भाष्य केले. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात चर्चेसाठी इतर अनेक विषय आहेत. प्रत्येकवेळी राजकारणावरच चर्चा झाली पाहिजे का, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. तसेच शरद पवार यांचा या सरकारला पूर्णपणे आशीर्वाद असून हे सरकार पाच वर्षे चालेल असे प्रतिपादन राऊत यांनी केेले.
दरम्यान, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या पुढाकाराने सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे हे सरकार टिकवणे ही केवळ शिवसेनेचीच जबाबदारी नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना ध्यानात आणून दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर आज दुपारची मंत्रीमंडळाची बैठक वादळी ठरण्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.